खानापूर : मराठी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी तसेच मागील 66 वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्यासाठी सीमावासीयांनी दिलेला लढा व्यर्थ जाऊ नये. यासाठी तालुक्यातील मराठी जनतेने समितीच्या झेंड्याखाली एकत्र या व राष्ट्रीय पक्षाच्या प्रलोभनांना बळी पडू नका. सीमालढा हा अनेकांच्या त्यागावर आणि बलिदानावर उभा आहे. सीमालढ्यासाठी अनेक हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे. याची जाणीव आजच्या युवा पिढीने ठेवावी व सीमाप्रश्न सुटेपर्यंत हा लढा जिवंत ठेवावा, अशी भावनिक साद 93 वर्षीय ज्येष्ठ सीमा सत्याग्रही शंकर पाटील यांनी घातली.
खानापूर समिती आयोजित ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी व संत तुकाराम गाथा सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे संत ज्ञानेश्वरी व संत तुकाराम गाथा पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. येथील ज्ञानेश्वर मंदिर परिसरात उभारलेल्या व्यासपीठावरील सीमा सत्याग्रही शंकर पाटील, नारायण लाड, दे. बा. घाडी गुरुजी, बाबुराव गुरव माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले.
सीमासत्याग्रहींकडून मराठी भाषेची, संस्कृतीची पालखी युवकांकडे देण्यात आली व आजच्या तरुण पिढीने हा सीमालढा जिवंत ठेवून सीमाप्रश्न सोडवून घ्यावा, अशी अपेक्षा बाबुराव गुरव यांनी व्यक्त केली. तर माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले की, गेली 66 वर्षे आपण महाराष्ट्र राज्यात जाण्यासाठी लढत आहोत. मात्र अद्याप आम्हाला यश आले नाही. मात्र विधुरायच्या राज्यात जाण्यासाठी हा लढा आणखी तीव्र करूयात व या ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून प्रत्येक मराठी माणसाच्या मनात सीमाप्रश्नी जागरूकता निर्माण करूया व मराठी अस्मिता जागी करूया. यानंतर प्रवचनकार विठ्ठल पाटील यांचे प्रवचन झाले व ह.भ.प. नारायण काळे यांचे कीर्तन झाले.
ज्येष्ठ सीमासत्याग्रही बाबुराव गुरव यांच्या हस्ते पालखी पूजन झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची घोषणा देण्यात आली आणि बाबुराव गुरव यांनी अंगावर शहारे आणणारा शिवरायांचा पोवाडा सादर केला. त्यांच्यातील आवेश आणि तळमळ पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट केला व मनाचा मुजरा दिला. यावेळी खानापूर तालुक्यातील समितीप्रेमी जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
यावेळी समिती नेते आबासाहेब दळवी, यशवंत बिर्जे, मुरलीधर पाटील, नारायण कापोलकर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.