कोल्हापूर : सिंधुदुर्गमधील पुतळ्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आरोपी चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्यानंतर चेतन पाटीलच्या कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथील घरी जात पोलिसांनी चौकशी देखील केली होती. अशातच आता चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
चेतन पाटील याला आता मालवण पोलीस ठाण्यात आणले जाणार असून त्याची कसून चौकशी केली जाईल. या चौकशीतून शिवाजी महाराजांच्या मूर्तीविषयी आणखी कोणती नवी माहिती समोर येणार, हे पाहावे लागेल. चेतन पाटील हा स्ट्रक्चरल कन्सल्टंट असून त्याच्या दाव्यानुसार मूर्तीसाठी जे फाऊंडेशन (चबुतरा) उभारला होता, त्याचे डिझाईन त्याने नौदलाला तयार करुन देण्यात आले होते. यापलीकडे त्याला नौदलाकडून कोणतीही वर्क ऑर्डर किंवा पत्र प्राप्त झाले नसल्याचे चेतन पाटील याने अगोदरच स्पष्ट केले होते.
चेतन पाटीलने फेटाळलेले आरोप
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील मूर्तीप्रकरणी पोलिसांनी जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केलेला. चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावलेले. मी शिवाजी महाराजांच्या संपूर्ण मूर्तीचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही. मी फक्त या मूर्ती उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन करून दिलं होतं. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे जे काम केलं होतं, ते ठाण्यातील कंपनीनं केलं होतं, असं चेतन पाटीलनं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची उभारणी करणारा ठाण्यातील जयदीप आपटे या तरुणाचा शोध सुरू होता. दरम्यान, सध्या चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून जयदीप आपटेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.