मुंबई : काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली, त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश होतो, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. माझ्या मते शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही, असं वक्तव्यही शरद पवार यांनी केलं आहे. ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या श्रीमंत कोकाटे लिखित पुस्तकाचं पुण्यामध्ये शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झालं. या कार्यक्रमाला कोल्हापुरचे शाहू छत्रपती, जयसिंगराव पवार आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात शरद पवारांनी शिवचरित्राबाबत हे वक्तव्य केलं आहे.
‘काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली’
यावेळी शरद पवार यांनी म्हटलं की, ‘काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली तर काहींनी धादांत खोटी माहिती दिली. पण श्रीमंत कोकाटेंनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. भारतात अनेक राज्यकर्ते झाले. मौर्यांचे राज्य, अशोकाचे राज्य, यादवांचे राज्य… पण शिवाजी महाराजांचे राज्य यापासून वेगळे होते. कारण त्यांच राज्य कधी भोसल्यांचं राज्य झालं नाही ते रयतेचं राज्य म्हणूनच ओळखल गेलं. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला. ज्यांचा मातीशी संबंध आहे असा. शिवछत्रपतींचा उल्लेख करताना काही जणांनी धर्मांध चित्र रंगवण्याचा, संकुचित चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण श्रीमंत कोकाटेंनी सत्य मांडलं.’
‘छत्रपती शिवाजी महाराजांवर पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही’
पवारांनी पुढे सांगितलं की, ‘मी इग्लंडला गेलो. तिथे ग्रँड डफचे चार खंड विकत आणले. महाराष्ट्रात काही ग्रंथ खुप खपले. घराघरात ठेवले गेले. त्यामध्ये ग्रंथांमध्ये बाबासाहेब पुरंदरेंच्या ग्रंथाचा समावेश होतो. माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही. रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते का याबाबत मी जास्त बोलू इच्छित नाही. महाराष्ट्र सरकार आधी दादोजी कोंडदेव क्रिडा पुरस्कार द्यायचे. पण 2008 साली समिती सरकारने एक स्थापन केली आणि दादोजी कोंडदेव हे गुरु होते का याचा अभ्यास केला गेला. त्यातून असे समोर आले की दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु किंवा मार्गदर्शक नवहते तर जिजाबाई मार्गदर्शक होत्या.’
‘श्रीमंत कोकाटेंनी खरा इतिहास लिहिलाय’
श्रीमंत कोकाटेंनी खरा इतिहास लिहिलाय, असं शरद पवार यांनी या कार्यक्रमात म्हटलं आहे. संसदेचं अधिवेशन संपलं की मी या इतिहास संशोधकासोबत बैठक घ्यायला तयार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. वस्तुनिष्ठ इतिहास समोर येण्यासाठी प्रयत्न करायला तयार असल्याचं, शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta