शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची डरकाळी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबतच्या आमदारांसह भाजपवर पुन्हा एकदा घणाघात केला. आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात शिंदेंचे नाव न घेता उद्धव म्हणाले, ‘होय, गद्दार, गद्दारच म्हणणार. मंत्रिपदे काही काळापर्यंत राहतील, पण कपाळावरला गद्दारीचा शिक्का या जन्मी पुसता येणार नाही. स्वत:च्या वडिलांच्या नावाने मते मागण्याची हिंमत नाही. दुसऱ्याचा बाप चोरणारी अवलाद आहे ही. अरे आपल्या वडिलांना तरी घाबरा. तुम्हाला २० वर्षांनी दिघे आठवले, ते एकनिष्ठ होते.’
महागाई आठवू द्यायची नसल्याने भाजपचे गायी, हिंदुत्वाचा डोस सुरू आहे. सध्या देश हुकूमशाही कडे चालला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली. गृहमंत्री अमित शहा हे प्रत्येक राज्यात जातात. काड्या करतात आणि सरकार पाडतात. मात्र, तुम्ही साथ द्या. तुम्हाला पुन्हा सरकार आणून दाखवेन, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
ठाकरे म्हणाले, एकाअर्थी झाले, ते बरे झाले. फक्त तुम्ही साथ द्या. पुन्हा सरकार आणून दाखवतो. बरे झाले. बांडगुळे गेले. ती बांडगूळ सेना म्हणा, असे कोणी तरी मला म्हणाले. मात्र, तो बांडगुळ गट आहे. माझ्या मनात विश्वास आहे. ज्या महिषासूर मर्दीनीने महिषासूर मारला. ती महिषासूर मर्दीनी हा खोकासूर मारेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरेंच्या भाषणानंतर शिवाजी पार्कवर रावण दहन करण्यात आले. भाजपचे स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवावे. तुम्ही आमच्या पत्रकार परिषद ऐकल्या. आम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदा घ्यायचो. कधीही अजित पवारांनी माझ्यासमोरचा माइक ओढला नाही. आम्ही सोबत असताना भाजपने औरंगाबादचे संभाजीनगर केले नाही. उस्मानाबादचे धाराशिव केले नाही. मात्र, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असताना ते करून दाखवले.
देशातील लोकशाही राहते की नाही, हा गंभीर प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना सावधानतेचा इशारा देतोय. सगळे पक्ष संपणार आणि एकच पक्ष राहणार म्हणजे देश हुकूमशाहीकडे चालला आहे. ही गुलामगिरी तुम्हाला चालणार आहे का?, हिंदुत्व म्हणजे नेमके काय. तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी एकाच व्यासपीठावर यावे आणि सांगावे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा सांगितले की या देशावर प्रेम करणारा मुसलमान असला, तरी तो आमचा. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. घराबाहेर पडल्यानंतर देश हाच धर्म म्हणावा. मात्र, बाहेर येऊन कुणी मस्ती दाखवत असेल, तर आम्ही खरे हिंदुत्व दाखवू. पाकिस्तासमोर, चीनसमोर जाऊन शेपट्या घालायच्या. इकडे येऊन पंजा दाखवायचा ही तुमची मर्दुमकी. इकडे येऊन प्रकल्प पळवतायत. आम्हाला गुजरातबद्दल आसूया नाही. मात्र,मोठे प्रकल्प गुजरातमध्ये नेणे ही कितपत योग्य आहे?
अमित शहा आम्हाला जमीन दाखवाच
अमित शहाजी आम्हाला जमीन दाखवाच. पाकिस्तानने बळकावलेली आमची जमीन एक इंच आणून दाखवा. मोदींच्या त्या मुलाखती आम्ही आजही ऐकतो. पाकला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ. मात्र, पाकव्याप्त काश्मीरची एक इंचही जमीन तुम्ही घेऊ शकला नाहीत.
ज्यांना जबाबदारी दिली ते कटप्पा कट करत होते
गद्दारच म्हणार, मंत्रिपद काही काळ पण गद्दारीचा शिक्का नेहमीच तुमच्या कपाळावर असणारच. शिवसेनेचे काय होणार मला चिंता नव्हती. ही गर्दी बघितली तर आता प्रश्न गद्दारांचे कसे होणार. रावण दहन होईल, या वेळी रावण वेगळा कालानुरूप तोही बदलतो वाईट इतकच मी रुग्णालयात असताना ज्यांना जबाबदारी दिली ते कटप्पा ते कट करत होते.
Belgaum Varta Belgaum Varta