पंढरपूर : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाबाबत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून होत असणाऱ्या बेताल वक्तव्यामुळे सध्या दोन्ही राज्यातील वातावरण अतिशय कलुषित झाले आहे. याचा फटका कानडी विठ्ठल भक्तांना बसू लागला आहे. सध्या दोन्ही राज्यातील वातावरण बिघडत चालल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बस सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. अशातच महाराष्ट्राच्या बसेस सीमेवर जाऊन प्रवासी सोडत असून कर्नाटक मधील बसेसची त्यांच्या सीमेपर्यंत येऊन प्रवासी सोडून परत जात आहेत.
कानडा विठ्ठलु कर्नाटकू या संत वचनाप्रमाणं रोज शेकडो कानडी भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. मात्र गेल्या चार दिवसापासून बस सेवा बंद झाल्याने या भाविकांना खाजगी वाहने घेऊन पंढरपूरला यावे लागत आहे. यातही सीमेवर तणाव असल्याने रात्रीची वाट पाहत या गाड्या सीमेवर थांबून राहतात आणि रात्री उशिरा चोरून महाराष्ट्रात प्रवेश करीत असल्याचे कर्नाटक येथून आलेल्या भाविकांनी सांगितले.
हे सर्व प्रश्न राजकीय असून दोन्ही राज्यातील नेत्यांनी बसून ते शांतपणे सोडवावेत मात्र याचा त्रास आम्हा विठ्ठल भक्तांना होऊ नये अशी अपेक्षा हे भाविक करीत आहेत. कारवार येथून आलेल्या भाविकांनी गोवा मार्गे पंढरपुरात येऊन विठ्ठल दर्शन केले असून आता विठुरायाच्या कृपेने लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा आणि आम्हाला विठ्ठल दर्शनासाठी येत यावे अशी अपेक्षा विठुरायाकडे करीत आहेत. बससेवा बंद असल्याने गोरगरीब विठ्ठल भक्तांना मात्र या सीमावादामुळे विठुरायाच्या दर्शनापासून वंचित राहावे लागत आहे . पंढरपूर आगारातून कर्नाटकमध्ये 13 बसेस रोज ये जा करत असतात. मात्र गेल्या चार दिवसापासून हुमानाबाद , विजापूर , हुबळी , गाणगापूर सह अनेक भागात जाणाऱ्या आणि येणाऱ्या बसेस पूर्णपणे बंद झाल्याने विठ्ठल दर्शनासाठी कानडी भक्तांना भीत भीत रात्रीतून प्रवास करून पोचावे लागत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta