मुंबई : गेल्या महिन्याभरापासूवन राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. रवींद्र धंगेकरांच्या रुपाने महाविकास आघाडीला भाजपावर मोठा विजय मिळाल्याचं दिसून येत आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला आहे.
कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तिथे पोटनिवडणुका लागल्या. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती. खुद्द टिळक कुटुंबातूनही तशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी भाजपाकडून माजी आमदार हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे कसब्यात भाजपाविरोधी नाराजी असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर आज मतमोजणीनंतर ही नाराजी निकालाच्या रुपाने दिसून आल्याचं सांगितलं जात आहे.
२८ वर्षांनंतर कसब्यात सत्ताबदल!
दरम्यान, तब्बल २८ वर्षांनंतर कसब्यामध्ये आमदारकी भाजपाकडून काँग्रेसकडे आली आहे. याआधी १९९२ च्या निवडणुकीत कसब्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. २००९ मध्येही कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी गिरीश बापट यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना विजय मिळवण्यात अपयश आलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपाविरोधी असणारी नाराजी रवींद्र धंगेकरांच्या पथ्यावर पडल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. सन २००९ ची विधानसभा निवडणूक रवींद्र धंगेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढविली होती. त्यावेळी त्यांनी गिरीश बापट यांना कडवे आव्हान दिले होते. त्या निवडणुकीत गिरीश बापट यांना सात हजार मतांनी निसटता विजय मिळाला होता.
हेमंत रासनेंनी पराभव मान्य केला
“कार्यकर्त्यांशी, त्या भागातल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करता येईल. मी घरोघरी जाऊ शकत नव्हतो, पण आमची यंत्रमा घरोघरी गेली होती. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे घडलेलं नाही. नाराजीचा फार फरक पडला असं मला वाटत नाही. मी कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं. मला यावर थोडं चिंतन करावं लागेल. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. मला विजयाची खात्री होती”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी देत आपला पराभव मान्य केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta