रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याला किल्ले रायगडावर सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हा सोहळा रायगडावर साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड चढताना अंगावर दरड कोसळल्याने एका शिवभक्ताचा मृत्यू झाल्याने शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. ही घटना रविवारी (05 जून) घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली. प्रशांत अरुण गुंड (वय 28, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत हा रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर गेला. शिवरायांच्या दर्शनासाठी वादळी पावसात रायगड किल्ला चढत राहिला.
परंतु, महादरवाजाजवळ पोहोचताच त्याच्यासोबत दुर्दैवी घटना घडली. अंगावर दरड कोसळल्याने प्रशांतचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच प्रशांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
रायगड चढताना चार दिवसांपूर्वी बेळगावच्या संकेश्वर येथील एका शिवभक्ताचा मृत्यू झाला होता. याआधी एकाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेला आठवडा उलटला नाही, तोच प्रशांतसोबत दुर्देवी घटना घडली. शिवभक्तांनी रायगड चढताना सावधानी बाळगावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले. बेळगावजवळच्या संकेश्वर येथील ओंकार दीपक भिसे (19) याचा 2 जून रोजी तर पुणे येथील प्रशांत गुंड (28) याचा 5 जून रोजी रायगडावर मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली या घटनांची चौकशी करण्याचे आदेश दिले. रायगडावर जाण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी आहे. मात्र, शिवभक्तांसाठी रोप-वे बंद करण्यात आला आहे. अशातच आता रविवारपासून रोप-वेची तिकीट विक्रीही बंद करण्यात आली. त्यासाठी रायगडावरती पाण्याची तीव्र टंचाई असल्याचे सांगितले गेले. रोप वे बाबत प्रशासनाने घेतलेली भूमिका याबद्दल शिवभक्तांमधून मोठी नाराजी व्यक्त होत आहे.