Tuesday , September 17 2024
Breaking News

ठाण्यातील रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू

Spread the love

 

ठाणे : दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पाच रुग्ण दगावल्याची घटना घडलेली असतानाच ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आणखी 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच रात्रीत शिवाजी रुग्णालयात 17 रुग्ण दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गेल्या चार दिवसातील रुग्णालयातील मृतांची संख्या 22 वर गेली आहे. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे या रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे हे रुग्ण दगावल्याचं सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्ण दगावले आहेत. या मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयात पाच रुग्ण दगावले होते. त्यानंतर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. रुग्णांवर वेळेवर उपचार होत असल्यानेच त्यांचा मृत्यू ओढवल्याचं रुग्णांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

शेवटच्या क्षणी रुग्ण येतात
कळवा रुग्णालयातील रुग्णांची संख्या मोठी आहे. पावसामुळे साथीचे आजार वाढले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढली आहे. परिणामी प्रशासनावर ताण येत आहे. रुग्णांना वेळेवर अटेंड करणं कठिण होत आहे. त्यातच अनेक रुग्ण गंभीर आजाराचे आहेत. काही रुग्ण शेवटच्या क्षणी रुग्णालयात येतात. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणं कठिण जातं. प्रत्येक रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पण मनुष्यबळाच्या अभावी प्रत्येक रुग्णाला वेळ देता येत नसल्याने उपचारा अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण
या रुग्णालयाची क्षमता 1500 रुग्णांची आहे. पण रुग्णालयात रोज क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल होत आहेत. काही वेळा तर एका बेडवर दोन रुग्णांना झोपवावं लागत आहे. साथीच्या आजारामुळे ही संख्या अधिकच वाढली आहे. त्यातच डॉक्टर आणि परिचारिकांची संख्याही कमी आहे. त्यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याचंही सांगण्यात येतं.

रुग्णालयावर ताण
माजी महापौर नरेश म्हस्के यांनी या प्रकारावर विधान केलं आहे. या रुग्णालयाची 500 रुग्णांची कॅपेसिटी आहे. पण रोज रुग्णालयात 6500 रुग्ण भरती होत आहेत. शहापूर, पालघर, वाडा, मोखाडा, शहाड येथून या ठिकाणी रुग्ण येत असतात. त्यातच पावसाळी आजारांचेही रुग्ण येत आहेत. रोज रुग्णालयात 1200 ते 1300 बाह्य रुग्ण येत असतात. पण आता 2 हजाराहून अधिक रुग्ण येऊ लागले आहेत. प्रशासनावर ताण पडत आहे, असं नरेश म्हस्के म्हणाले.

मृतांची हिस्ट्री तपासा
जे 17 रुग्ण दगावले आहेत. त्यापैकी एक जण शहापूरचा आहे. त्याला सर्प दंश झाला आहे. एकाला रॉकेलचं पॉयझनिंग झालं आहे. एक अनोळखी बाई आहे. तिच्या डोक्याला मार लागला आहे. मागच्या आठवड्यात जे रुग्ण दगावले त्यापैकी एका रुग्णाला फिट येत होती. उलट्या व्हायच्या. हे रुग्ण का दगावतात त्यांची हिस्ट्री तपासा. शेवटच्या क्षणी ते रुग्णालयात उपचाराला येतात. त्यामुळे वेळ निघून गेलेली असती. डॉक्टर प्रयत्न करतात. पण त्यांना यश येत नाही, असंही म्हस्के म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

विनायक नगर येथे दुचाकी जाळण्याचा प्रकार

Spread the love  बेळगाव : विनायक नगर येथे सोमवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घरासमोर लावण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *