संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कामगार झोपेत असताना कंपनीला आग लागली. वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला आग लागली. या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 4 कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला.
वाळूज औद्योगिक परिसरात आग
वाळूज औद्योगिक परिसरात सनशाईन एंटरप्राईज सी 216 या हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुमारे 20 ते 25 कामगार काम करतात. 10 कामगार कामगार कंपनीमध्ये राहतात. सगळे झोपेत असताना अचानक आग लागली. काही झोपलेल्या कामगारांना गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचं दिसलं. यानंतर जीव वाचण्यासाठी कामगारांची पळापळ सुरु झाली.
सहा कामगारांचा होरपळून मृत्यू
कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने आतमध्ये असलेल्या कामगारांना बाहेर पडणं शक्य नव्हतं, पण काही कामगारांनी पत्र्यावरून एका झाडाच्या साहाय्याने सुखरुप बाहेर पडण्यात यश मिळवलं. भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अन्य दोन मिर्झापूर या सहा कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.
हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग
आगीतून सुखरूप बचावलेला कामगार अली अकबर याने घडलेला प्रकार सांगितला. अली अकबरने सांगितलं की, ”काम बंद करून आम्ही झोपी गेलो होतो. मध्यरात्री आम्ही पांघरून घेऊन झोपलो असता, आम्हाला गरमी झाल्याने जाग आली. आगीच्या वाफेमुळे गरम होऊन जाग आली आणि आजूबाजूला पाहतो तर सगळीकडे आग पसरली होती. आम्ही आरडाओरड करत इतरांना जाग करण्याचा प्रयत्न केला. कंपनीतून बाहेर पडण्याच्या दरवाजाच्या बाजूने आग लागल्याने आगीतून बाहेर पडणं कठीण झालं होतं. त्यानंतर दरवाजाच्या बाजूने आग लागल्यामुळे कामगारांनी वरती चढून पत्र्यावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. चार जण सुखरुप बाहेर पडले.”
अग्निशमन अधिकारी मोहन मुनसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”आम्हाला 2.15 मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तिथे पोहोचल्यानंतर फॅक्टरीत आग लागल्याने धुमसत असल्याचं चित्र होतं. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगीमध्ये सहा जण अडकल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंग करुन आतमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं. ” पहाटे चार वाजेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते, त्यानंतर आग विझवण्यात यश आलं. आगीत सहा कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.