मुंबई : वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक मंगळवारी रात्री झाली. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत युती करुन लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि कार्यकारणीच्या काही सदस्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुसंदर्भात चर्चा झाली. या चर्चेत मनोज जरांगे पाटील यांनी ३० तारखेपर्यंत थांबण्याची सूचना केली. कारण ३० तारखेला मनोज जरांगे पाटील समाजातील लोकांसोबत चर्चा करणार आहे. त्यांच्यासमोर या नवीन आघाडीचा प्रस्ताव ठेवणार आहे. त्यानंतर दोन्ही जण मिळून जागा वाटप करणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना सर्वसामान्य आणि गरीब व्यक्तींना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच २ एप्रिलपर्यंत उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे ४ एप्रिलपर्यंतच्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अशी होणार आघाडी
प्रकाश आंबडेकर आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट झाल्याची बातमी बुधवारी सकाळी आली. राज्यात नवीन काही घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळू लागले. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला मोठा झटका दिला. महाविकास आघाडीने मनोज जरांगे फॅक्टरकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी नवीन आघाडीची घोषणा केली.
ही नवीन आघाडी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत करण्यात आली. वंचितच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याला मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आता अंतिम निर्णय येत्या ३० तारखेला होणार आहे.
लोकांना परिवर्तन हवे
महाविकास आघाडीवर टीका करताना प्रकाश आंबडेकर म्हणाले की, महाविकास आघाडीने मनोज जरांगे पाटील फॅक्टरकडे दुर्लक्ष केले. तसेच वंचित बहुजन आघाडीचा वापर परिवारवाद वाचवण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला गेला. हे आम्ही फेटाळून लावले. आमच्या निर्णयावर टीका होईल. परंतु लोकांची नस मला माहीत आहे. लोकांना आता परिवर्तन हवे आहे. मनोज जरांगे पाटील सोबत आता एक आमची सामाजिक आघाडी होत आहे. लोक ही आघाडी स्वीकारतील, अशी मला अपेक्षा आहे. यामुळे आता नवीन राजकारण सुरु होणार आहे. नितीमत्ता असणारे हे राजकारण असणार आहे. मूल्यांचे राजकारण होणार आहे. सामान्य लोकांचे प्रश्न या नवीन आघाडीमुळे सुटणार आहे.