नागपूर : कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाच्या वतीनं देण्यात आले आहेत. उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही नागपूर खंडपीठाच्या वतीनं देण्यात आला आहे. 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारावर कुख्यात डॅान अरुण गवळीनं शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती.
गँगस्टर अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पुर्ण झाली होती. मात्र, कोर्टानं निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयानं अरुण गवळी यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे. आता जेल प्रशासन काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात तसेच, इतर गुन्हेगारी कृत्य यासाठी गवळीला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सध्या अरुण गवळी नागपूच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
2006 चा शासन निर्णय काय?
वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळते. त्यानुसारच डॉन अरुण गवळीची शिक्षेतून मुदतीपूर्व सुटकेची मागणी केली होती आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2006 चा महाराष्ट्र सरकारचा परिपत्रक काय आहे?
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना चौदा वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यावर, तसेच त्यांचे वय 65 पेक्षा जास्त असल्यावर तुरुंगातून सोडता येईल.
गवळीचा जन्म 1955 चा असल्याने त्याचे वय 69 वर्ष आहे.
जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी 2007 पासून तुरुंगात असल्याने गेली सोळा वर्ष तो तुरुंगात आहे.
म्हणजेच वर्ष 2006 च्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या दोन्ही अटी अरुण गवळी पूर्ण करतो.
त्यामुळे न्यायालयाने त्याची शिक्षातून मुदतपूर्व सुटका करण्यात यावी असा निर्णय दिला आहे.