मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळालं. महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा 31 जागांवर विजय झाला आहे. आता लोकसभेच्या निवडणूक निकालांनंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिंदेंचे काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यानं यासंदर्भात माहिती दिली आहे.
लोकसभा निवडणुकी दरम्यान आणि लोकसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठल्याही प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहूनसुद्धा तटस्थ भूमिका ठेवली, अशा आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार
आतापर्यंत एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रामुख्यानं ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta