नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे स्वप्न पूर्ण झालं असून दिल्लीतून अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आलाय. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मंत्री उदय सामंत यांना हा आदेश सोपवला असून हवा असलेला शासन आदेश निघाल्याने राज्यभर या आदेशाचे स्वागत केले. त्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याचे अधिसूचना तात्काळ काढावी यासाठी दिल्लीला गेले होते. तिथून अभिजात मराठी भाषेच्या आदेशाची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी आज उदय सामंत यांच्या हाती दिली. आज उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची सदानंद मोरे आणि ज्ञानेश्वर मुळेंसोबत भेट घेतली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची घोषणा झाली असली तरी अधिसूचना न निघाल्याने त्यासंदर्भात ही बैठक होती.
यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, आज आम्ही केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेतली. त्यांनी अभिजात भाषेसाठीची अधिसूचना आमच्याकडे सुपूर्द केली आहे. यासाठी मी त्यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार मानतो.”उदय सामंत यांनी या अधिसूचनेला ऐतिहासिक म्हणत सांगितले की, “हा एक अनोखा योगायोग आहे. ११ वर्षांपूर्वी, जेव्हा हा प्रस्ताव पाठवला गेला, तेव्हा मी मराठी भाषेचा राज्यमंत्री होतो. आज, अभिजात भाषेसाठीचा शासन आदेश (GR) हाती मिळाला तेव्हा मी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री आहे.” त्यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या GR च्या आगमनाला खास महत्त्व असल्याचे नमूद केले.