जम्मू- काश्मीर : दहशतावद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या कारवाई दरम्यान एका कनिष्ठ आधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात भारतीय लष्कराने दहशतवाद विरोधी कारवाई सुरु केली आहे. यावेळी दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. यामध्ये एका आधिकाऱ्यासह चार जवान गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना जवळील लष्काराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिलीय.
भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक अद्याप सुरुच आहे. तीन ते चारी दहशतवादी दबा धरुन बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु झाले होते. सध्या सैन्याने या पूर्ण परिसराची घेराबंदी केलीय. पुंछ जिल्ह्यातील सुरणकोटे भागात डेरा की गली या गावात हे सैन्य अभियान सुरू आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीर येथे दहशतवाद्यांविरोधात ठोस पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत विविध भागात दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन केलं जात आहे.
दरम्यान, रविवारी सुरक्षादलांनी मोठी कारवाई करत लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, अल बद्र आणि द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनांशी संबंधित ९०० जणांना ताब्यात घेतलं. यांच्याकडून दहशतवादाला समर्थन दिलं जात असल्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी दिली.