सांगली : येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने दिला जाणारा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार यावर्षी कॉम्रेड वृंदा करात यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती क्रांतिसिंह लोक विद्यापीठाचे संघटक कॉम्रेड सुभाष पाटील आणि सचिव कॉम्रेड सुभाष पवार यांनी दिली आहे.
याबाबत कॉम्रेड पाटील म्हणाले, येत्या 6 ऑगष्ट रोजी दुपारी 1.30 वाजता येथील क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात हा पुरस्कार कॉम्रेड करात यांना प्रा. डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य विश्वास सायनाकर यांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह , शॉल , श्रीफल, आणि रोख रुपये 21 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
कॉम्रेड वृंदा करात या पश्चिम बंगालमधील असून विद्यार्थी दशेपासून एस. एफ.आय. या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी प्रश्नावर संघर्ष करत आल्या आहेत. लंडन येथील एअर इंडियाच्या प्रशासनाविरुद्ध त्यांनी हवाई सुंदरीच्या युनिफार्मसाठी संघर्ष करुन आपले म्हणणे मान्य करुन घेतले. दिल्लीमधील कापड गिरणी मजूरामध्ये सिटू या कामगार संघटनेच्या माध्यमातून काम केले. 2005 मध्ये पश्चिम बंगालमधून त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या. एक अत्यंत जागरुक आणि लढाऊ खासदार म्हणून त्यानी प्रभावी काम केले आहे. त्याचवेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलीट ब्युरो या सर्वोच्च बाडीमध्ये त्यांची निवड झाली. सामान्य माणसाप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि योगदान लक्षात घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापिठाने त्यांना आपला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देणेचे निश्चित केले आहे.