नवी दिल्ली : माजी रेल्वेमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या घरावर छापा सक्तवसुली संचनालयाने (ईडी) आज (दि.११) छापा टाकला. जमिनीच्या बदल्यात नोकरीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांकडे सुमोर ६०० कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता आहे, असा दावा ईडीने केला आहे.
माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यावद यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांविरोधीत नोकरी लावण्यासाठी जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आला होता, याचा तपासही ईडीकडून सुरू आहे. ईडीने शुक्रवारी लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या घरावर आणि परिसरात छापे टाकले. याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांचे पुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचीही चौकशी होणार आहे. त्यांना सीबीआयने समन्स बजावले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (दि.११) ‘जमिनीच्या मोबदल्यात रेल्वेमध्ये नोकरी’ घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्या अनेक नातेवाइकांच्या दिल्ली आणि बिहार येथील ठिकाणी छापे टाकले. लालू प्रसाद यांची कन्या मीसा भारती यांच्या दिल्लीतील तसेच राजदचे नेते आणि बिहारमधील माजी आमदार अबू दोजाना यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजप आमच्याशी राजकीय लढाई लढणार का? असे ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
लालू प्रसाद यादव यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आणीबाणीचा काळोखही आपण पाहिला आहे. ती लढाईही आम्ही लढलो. आज माझ्या मुली, नातवंड आणि गर्भवती सून यांना ईडीने बिनबुडाच्या बदनामीच्या प्रकरणात १५ तास बसवून ठेवले आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजप आमच्याशी राजकीय लढाई लढणार का? संघ आणि भाजपविरुद्ध माझा वैचारिक लढा आहे आणि राहील. मी त्यांच्यापुढे कधीही झुकलो नाही आणि तुमच्या राजकारणापुढे माझ्या कुटुंबातील आणि पक्षातील कोणीही झुकणार नाही.
Belgaum Varta Belgaum Varta