मध्य अमेरिकन देश एल साल्वाडोरमध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला. एल साल्वाडोरच्या राष्ट्रीय नागरी पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार प्रेक्षकांनी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, या गडबडीत काहीजण खाली पडले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. ज्यात 9 जणांचा मृत्यू झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साल्वाडोरन फुटबॉल लीगच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना होता. ज्यात अलियान्झा आणि एफएएस या संघांमध्ये लढत होणार होती. हे दोन्ही संघ एल-साल्व्हाडोरमधील सर्वात प्रसिद्ध संघांपैकी एक असल्याने या सामन्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक स्टेडियममध्ये आले होते. दरम्यान, काही लोकांनी जबरदस्तीने स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे वादावादी झाली. यातून गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली यात गुदमरून नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.
चेंगराचेंगरीत सुमारे 500 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फुटबॉल सामना सुरू झाल्यानंतर 16 मिनिटांनी ही दुर्घटना घडली, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला.