अयोध्या : पवित्र मंत्रोच्चाराचा ध्वनी… शंखनाद आणि जय श्रीरामच्या घोषात आज प्रभू श्रीरामाचं अयोध्या नगरीत आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करून श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही सुरू होत्या. आपल्या लाडक्या दैवताचा हा प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा अवघ्या देशाने डोळेभरून पाहिला. हा सोहळा पाहताना हजारो डोळ्यांच्या कडा पाणावल्या. ऊर अभिमानने भरून आला. अन् मनामनातून जय श्रीरामचा जयघोष निनादला…
पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबर दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी राम मंदिरात दाखल झाले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिरात अनुष्ठान पार पडले. स्वत: मोदीही मंत्रांचे पठन करत होते. हा वैदिक मंत्रोच्चार आणि शंखनाद सुरू असताना पंतप्रधान मोदी अत्यंत भावूक झाले होते. राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर रघुपती राघव राजराम हे भजन गाण्यात आलं. श्रीराम अयोध्येत आहे त्याच जागी विराजमान झाले आणि तब्बल 500 वर्षाची प्रतिक्षा आज संपुष्टात आली. आजच्या सोहळ्या निमित्ताने अयोध्या नगरी हजारो क्विटल फुलांनी सजवली होती. चेन्नईतून खास फुले मागवली होती. सर्वत्र शंखनाद सुरू होता.
मोदींच्या हस्ते आरती
रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी शहनाईचे सूर असमंतात दरवळत होते आणि शंखनादही सुरू होता. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. अयोध्येत ठिकठिकाणी हे लाइव्ह प्रक्षेपण सुरू होतं. सर्वांना हा सोहळा पाहता यावा यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. देशभरातही हा सोहळा पाहण्यासाठी ठिकठिकाणी मोठमोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.
मिठाई, पेढ्यांचं वाटप
रामल्ललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताच मिठाई आणि पेढ्यांचं वाटप करण्यात आलं. पटाखे फोडण्यात आले. सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झालं होतं. अनेक मंदिरांमध्ये घंटानाद करण्यात आला. तसेच नागरिकांनीही जय श्रीरामच्या घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला.