
हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये बुधवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. गंगेत बुडून एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. दिल्लीतील एक कुटुंब आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्यासह हरिद्वारला हरकी पायडी येथे गंगेत स्नान करण्यासाठी आलं होतं. यावेळी येथे मुलाचा मृत्यू झाला. याचा एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला काही वेळ चिमुकल्याला गंगेच्या पाण्यात बुडवताना दिसत आहे. यानंतर आजूबाजूचे लोकही महिलेपर्यंत पोहोचले आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण महिला त्यांना धक्काबुक्की करू लागली. यानंतर बऱ्याच वेळानंतर महिलेने मुलाला पाण्यातून बाहेर काढलं. चिमुकल्याला कॅन्सर होता. तो गंगेत बुडवल्यावर बरा होईल या अंधश्रद्धेतून महिलेने हे कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे.
पाच वर्षांच्या मुलाच्या मृत्यूची माहिती देताना एसपी स्वतंत्र कुमार म्हणाले की, दिल्लीतील एक कुटुंब ब्लड कॅन्सरने ग्रस्त असलेल्या त्यांच्या 5 वर्षांच्या मुलाला घेऊन येथे आलं होतं. कुटुंबाने गंगेत स्नान करण्यासाठी आपल्या 5 वर्षाच्या चिमुकल्यासह हरिद्वार गाठलं होतं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात व्यस्त आहेत.
कुटुंबाला दिल्लीहून हरिद्वारला टॅक्सीतून घेऊन गेलेल्या ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्य लहान मुलासोबत त्याच्या कारमध्ये बसले तेव्हापासून तो खूप आजारी दिसत होता आणि हरिद्वारपर्यंत मुलाची तब्येत खूप खालावली होती. टॅक्सी चालकाच्या म्हणण्यानुसार, कुटुंबातील सदस्य मुलाची तब्येत बिघडल्याने त्याला गंगेत स्नान घालण्याबाबत बोलत होते. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta