बंगळूर : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हैदराबाद हेरगिरी प्रकरणी घोषित गुन्हेगार नूरुद्दीन उर्फ रफी याला अटक केली आहे.
नुरुद्दीन जामिनावर बाहेर आला असून तो अनेक दिवस बेपत्ता होता. त्याला म्हैसूरच्या राजीव नगरमध्ये अटक करण्यात आली आहे. नुरुद्दीनवर ५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. बुधवारी एनआयए अधिकाऱ्यांनी काही कारणास्तव त्याच्या राजीव नगर येथील घरावर छापा टाकला. त्याच्या घरातून मोबाईल फोन, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
नुरुद्दीन ऑगस्ट २०२३ मध्ये जामिनावर बाहेर आला होता आणि चेन्नईतील विशेष एनआयए न्यायालयात हजर न होता तो फरार झाला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आरोपी नूरुद्दीनविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आता नुरुद्दीनला एनआयएच्या पथकाने पकडले आहे. ७ मे २०२४ रोजी न्यायालयाने त्यांला गुन्हेगार घोषित केले.
दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये बंगळुरमधील इस्रायलचे दूतावास आणि चेन्नईतील अमेरिकन दूतावास उडवण्याचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर आहे. २०१४ मध्ये एनआयए अधिकाऱ्यांनी श्रीलंकन नागरिक मोहम्मद साकीर हुसेन आणि पाकिस्तानी नागरिक अमीर जुबेर सिद्दीकी, कोलंबो येथील पाकिस्तानच्या राजनैतिक कार्यालयातील कर्मचारी यांना अशाच आरोपाखाली अटक केली होती. आरोपींना बनावट भारतीय नोटांचा पुरवठा करून दहशतवादी कृत्यांना मदत आणि प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली नूरुद्दीनवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाकिस्तानी नागरिकाच्या सांगण्यावरून आरोपी नुरुद्दीनने बनावट नोटा चलनात आणून या कृत्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. भारतीय चलनी नोटांचा वापर करून देशविरोधी हेरगिरी कारवायांसाठी वित्तपुरवठा करण्यात नूरुद्दीनचा सहभाग असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे.