मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील श्योपुर जिल्ह्यात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. श्योपूर जिल्ह्याच्या सिप नदीत ११ प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. या दुर्घटनेत पाच चिमुकल्यांसह सात जणांचा मृत्यू झाला तर चार जणांना वाचवण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मध्य प्रदेशातील श्योपूर येथे शनिवारी अचानक आलेल्या वादळामुळे एक बोट नदीत उलटली. या दुर्घटनेत बोटीतील ११ प्रवासी नदीत बुडाले, यामधील ४ जण पोहून किनाऱ्यावर आले. तर वेळी ५ मुलांसह ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनासह एसडीआरएफ बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढले.
दुर्घटनेतील सर्व प्रवासी हे स्थानिक रहिवासी असून माळी समाजातील असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व जण बोटीने अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे निघाले होते. अचानक आलेल्या वादळामुळे त्यांची बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण ११ जण होते. ज्यांपैकी सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चार जणांना वाचवण्यात यश आले.
दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अपघाताचे वृत्त समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. दुर्घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. तेथे उपस्थित लोकांनीही अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सात मृतांमध्ये ४-१५ वर्षे वयोगटातील पाच मुले, एक ३५ वर्षीय पुरुष आणि ३० वर्षीय महिलेचा समावेश आहे.