कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या टोलनाक्याजवळ माने मळ्यातील सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना सोमवार तारीख 9 रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील टोल नाक्याजवळ माने मळ्यात सर्वे नंबर 652, 653, 654 मध्ये अनिल शामराव माने, नंदकुमार मळगे, शशिकांत राजाराम माने, अमित माने, संजय माने, अण्णाप्पा माने, अर्जुन माने, आनंदा माने यांची सहा एकर ऊस शेती आहे. या शेतीमध्ये अचानक पेट घेतल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील अग्निशामक दलाने आग विझवण्यात यश मिळवले.
शेतकरी व नागरिकांची सतर्कता
राष्ट्रीय महामार्ग लगतच असणाऱ्या उसाच्या शेतीला आग लागल्याने जवळच टोलनाकालगत अनेक व्यावसायिकांची दुकाने व हॉटेल आहेत. ऊस शेतीतील आग दुकानाच्या बाजूने येत असताना शेतकरी व युवकांनी ताबडतोब येऊन ऊस तोडून ऊस शेतीचे दोन भाग केल्याने टोलनाक्याकडे येणारी आग विझली. यामुळे पुढील अनर्थ टाळला. अन्यथा या ठिकाणी व्यावसायिकांचेही लाखो रुपयाचे नुकसान झाले असते.
ऊस शेती लगतच गोठा
टोल नाक्याजवळ असणाऱ्या माने मळ्यालगतच अनेकांचे जनावरांचे गोठे आहेत. उसाच्या शेतीला आग लागून गोठ्याच्या दिशेने येत असल्याने शेतकऱ्यांनी जनावरे सोडून दिली तर गोठ्याकडे येणारी आग ताबडतोब विजवली.