बेळगाव : फुले, शाहूंचा वारसा जपत सत्यशोधक व शेतकरी चळवळीचा वारसा सांगणारे नेते म्हणजे रावजी पटील यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे सीमालढा जिवंत आहे. त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे, असे गौरवोद्गार निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांनी काढले.
माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील यांचा अमृतमहोत्सव सोहळा 8 जानेवारी रोजी मराठा मंदिर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर हे होते तर प्रमुख पाहुण्या कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव या उपस्थित होत्या. मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंत मुळीक, मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, खजिनदार प्रकाश मरगाळे, मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक अविनाश पोतदार, दाजीबा पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रावजी पाटील व सौ.विजयमाला पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थितांनी आपल्या भाषणातून रावजी पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बबन कानशीडे यांनी केले तर स्वागत समिती अध्यक्ष राजेंद्र मुतगेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी प्रदीप मुरकुटे, शेखर पाटील, दत्ता उघाडे, प्रकाश अष्टेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.