गेल्या १५ वर्षा पासून निपाणी मतदारसंघासह बाहेरील मतदारसंघातही शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केला आहे. रयत संघटनेच्या बळावर तालुक्यातील विखुरलेल्या शेतकऱ्यांचे संघटन करून न्याय देण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उसासह इतर भाजीपाला पिकाला हमीभाव मिळावा यासाठी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विधानसभेला सुध्दा घेराव घातला आहे. ऐन दिवाळीच्या काळात त्यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलीस कोठडीत जावे लागले. येत्या काळात शेतकऱ्यांची सेवा अधिक प्रमाणात करता यावी, या उद्देशाने ते धजदचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवीत आहेत. त्यानिमित्त त्यांची घेतलेली मुलाखत….
प्रश्न : रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष म्हणून कोणती महत्त्वाची कामे केली?
राजू पोवार : प्रत्येक गावातील शेतकरी संघटित नसल्याने दहा वर्षापासूनच आपण शेतकऱ्यांचे संघटन करून रयत संघटनेच्या नावाखाली कामकाजाला सुरुवात केली. प्रत्येक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ऊसाला चांगला दर, एफ आर पी वाढवून मिळावी. प्रत्येक ऊस उत्पादक सभासदाला १०० किलो साखर मिळावी, १५ दिवसात शेतकऱ्यांची ऊस बिल मिळावेत, यासह विविध आंदोलने छेडून शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. याशिवाय अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या पिकाला भरपाई मिळवून दिली आहे. तर पडदा झालेल्या घरांनाही मदत मिळावी,यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर संघटनेतर्फे आंदोलन करून न्याय मिळवून दिला आहे.
प्रश्न : राजकारणामध्ये प्रवेश करण्याचे कारण काय?
पोवार: रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. पण राजकर्ते बऱ्याच वेळा आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन आपण धजद पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहोत. त्यासाठी मतदार आणि कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यानुसार धजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रताप पाटील, प्रसन्नकुमार गुजर, सुनिता होनकांबळे यांच्यासह वरिष्ठांनी आपणाला तिकीट दिले असून निवडून आल्यानंतर त्यांच्या विश्वासाला पात्र राहून सर्वसामान्यांची कामे करणार आहे.
प्रश्न: निवडून आल्यानंतर शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी कोणती कामे करणार आहात?
पोवार : निवडून आल्यानंतर बळीराजाला चांगले दिवस अन्यासह निपाणी मतदारसंघात मूलभूत सुविधा आणि विकास कामे राबविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये रस्ते आरोग्य पाणी वीज शाळा अशा गोष्टींना अधिक महत्त्व देणार आहे. याशिवाय पिकाला हमीभाव, खतांचे दर कमी करणे, शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे बी बियाणे देणे या सर्व गोष्टींचा समावेश आहे. कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हायटेक मॉडेल सरकारी शाळा, आधुनिक संगणकीकृत विज्ञान प्रयोगशाळा, आधुनिक ग्रंथालय आधुनिक सभागृह, खेळाचे मैदान, मुलींचया शिक्षणाला प्राध्यान्य भविष्यासाठी पूरक क्रियाप्रकल्प, कुशल शिक्षणाचा मार्ग सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्मितीचा प्रयत्न धजद तर्फे केला जाणार आहे.
प्रश्न : प्रचारांमधील अनुभव काय?
पोवार : निपाणी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन विविध अडचणी समजावून घेऊन त्या मार्गी लावण्याचे काम यापूर्वी केले आहे. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये आपणाला मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक ठिकाणी सत्ताधारी पक्षाला नागरिक कंटाळल्याचे दिसून येत आहे. गावागावात कोपरा सभासद घर टू घर प्रचार कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत धजद पक्षाला चांगला पाठिंबा मिळत असून कुमार स्वामी हे मुख्यमंत्री होणार आहेत.
प्रश्न : मतदारसंघात धनशक्ती निवडणुकीत उतरल्याने धजदची भूमिका काय?
पोवार : निपाणी मतदारसंघात धनशक्ती निवडणूक रिंगणात असले तरी सर्वसामान्यांची कामे केल्याने सर्व स्तरातून आपल्याला पाठिंबा मिळत आहे. मतदारसंघातील बळीराजा आता जागृत झाला असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविलेल्या आणि कर्जमाफी योजना केलेल्या कुमार स्वामी यांच्या धजद पक्षावर विश्वास बसला आहे. तर पक्षाचे अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षांमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे निपाणी मतदारसंघात यंदा परिवर्तनाची नांदी होणार आहे.
प्रश्न : तरुण बेरोजगार युवक आणि महिलासाठी कोणत्या योजना राबविणार?
पोवार : बेरोजगार युवकासाठी कर्नाटक औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करून रोजगार उपलब्ध करणार आहे. या शिवाय महिलांना तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देऊन घरबसल्या उद्योग व्यवसाय करण्यासाठी कर्ज पुरवठा केला जाणार आहे. याशिवाय महिलांसाठी विशेष गारमेंट योजना सुरू केली जाणार आहे. विधवा अपंगांना दर महिन्याला अडीच हजार रुपये वाढीव मानधन. ६५ वर्षावरील व्यक्तींना दरमहा पाच हजार रुपये साहेब देऊन त्यांना दिलासा देणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना हक्काचा निवारा उद्यान खेळण्यासाठी मैदान सौर ऊर्जा प्रकल्प कसराविल्हेवाट यासह विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.