निपाणी (वार्ता) : कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयाचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक व एचजेसी चिफ फौंडेशनचे संस्थापक एस. एस. चौगुले यांना रयत शिक्षण संस्थेचा सर्वोच्च यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६४ व्या पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते डॉ. अनिल पाटील यांच्या उपस्थितीत सातारा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रातून माध्यमिक स्तरावर शैक्षणिक व संशोधन कार्य करणाऱ्या शिक्षकासाठी हा पुरस्कार दिला जातो. ५१ हजार, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
एस. एस. चौगुले हे कुर्ली सिद्धेश्वर विद्यालयात २२ वर्षे विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. ते विपनेट क्लब च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विज्ञान संशोधन व प्रयोग प्रात्यक्षिक कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. कुर्ली येथे दरवर्षी ते ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन, विज्ञान प्रदर्शन, विविध स्पर्धांचे आयोजन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सातत्याने सहभाग घेतला आहे. शिक्षक विभागात त्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. निती आयोगामार्फत अटल टिंकरिंग लॅब मंजूर करून घेतली आहे. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात ते उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचीत आहेत.रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य म्हणून कार्यरत असून संस्थेच्या रयत विज्ञान परिषद उपक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.एच जे सी चिफ फौंडेशनचे ते संस्थापक असून त्याच्या माध्यमातून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम आयोजित करतात. विद्यालयाच्या शैक्षणिक व भौतिक विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना अनेक नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण प्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सरोज पाटील माई, माजी मंत्री अजितदादा पवार, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार दिलिप वळसे पाटील, आमदार विश्वजीत कदम, डॉ. विठ्ठल शिवणकर, माधवराव मोहिते, डॉ. एम. बी.शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चौगुले यांना नाबार्ड चे माजी अध्यक्ष डॉ यशवंतराव थोरात विभागीय अधिकारी विनयकुमार हणशी, चिकोडी जिल्हा उपसंचालक मोहन हंचाटे, डायट प्राचार्य मोहन जिरगीहाळ, निपाणी गट शिक्षणाधिकारी रेवती मठद, मुख्याध्यापक बी. एस. पाटील, प्रा. संभाजी पाटील, श्रीनिवास पाटील, स्कूल कमिटी सदस्य अरुण निकाडे, ॲड. संजय शिंत्रे, सीमाताई पाटील, डी एस. चौगुले, सिताराम चौगुले, अंजली अमृतसमन्नावर यांच्यासह विद्यालयातील सेवक वर्गाचे प्रोत्साहन मिळाले. या पुरस्काराबद्दल चौगुले यांचे परिसरातून कौतुक होत आहे.