फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदोत्सव : एकमेकांना भरविले पेढे
निपाणी (वार्ता) : देशातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्तितीत शनिवारी(ता.२०) दुपारी बंगळूर येथील कंठिरवा स्टेडियमवर कर्नाटकाचे ३२ वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांनी शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्या सोबत ८ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्यामुळे निपाणी येथील काँग्रेस कार्यालयाजवळ काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात आमदार जी. परमेश्वर, के.एच मुनियप्पा, एम. बी.पाटील, के.जी. जॉर्ज यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे, रामलिंगा रेड्डी आणि जमीर अहमद खान यांनीही नवनिर्वाचित कर्नाटक सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता स्थापन झाल्यानंतर निपाणी येथील काँग्रेस पक्ष कार्यालयाजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.
या जल्लोषानंतर सामाजिक कार्यकर्ते विनोद साळुंखे, जरारखान पठाण, नवनाथ चव्हाण, असलम शिखलगार, किरण कोकरे यांच्यासह मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवाय काँग्रेस पक्षाने गॅरंटी कार्डच्या माध्यमातून जी प्रमुख पाच आश्वासने दिलेली होती. ती आश्वासने पहिल्या कॅबिनेट बैठकीत पूर्ण करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेले काँग्रेसचे सरकार कटीबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी निपाणी भाग काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेश कदम, सामाजिक कार्यकर्ते निकु पाटील, अशोक लाखे,किसन दावणे, सुजय पाटील, राजेंद्र चव्हाण, विजय शेटके, अल्लाबक्ष बागवान, इंद्रजीत जामदार, युवराज पोळ, मुकुंद रावण, सागर पाटील, रवींद्र श्रीखंडे, रियाज बागवान, मुन्ना पटेल, यासीन मनेर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta