आमदार शशिकला जोल्ले; रयत संपर्क केंद्रातर्फे बियाणे वाटप प्रारंभ
निपाणी (वार्ता) : शासनाने शेतकऱ्यांसाठी रयत संपर्क केंद्राच्या माध्यमातून अनुदानावर बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. शासन शेतकऱ्यांसाठी सबसिडीवर अनेक योजना राबवत असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार शशिकला जोल्ले त्यांनी केले.
येथील रयत संपर्क केंद्रातून खरीप हंगामातील सोयाबीन बियाणे वितरणाचा प्रारंभ आमदार शशिकला जोल्ले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यानंतर त्या बोलत होत्या.
निपाणी तालुक्यात ५ हजार हेक्टरवर पेरण्या होणार असून १०५० किंटल सोयाबीन बियाणे दाखल झाले आहे. सध्या निपाणी, बुदिहाल, कुर्ली, सौंदलगा, बेनाडी या केंद्रावरून बियाणे वितरण सुरू राहणार आहे. सध्या जेएस- ३३५ व जेएस ९३०५ या दोन्ही जातीचे बियाणे उपलब्ध झाले आहे. सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना जेएस ३३५ या बियाण्याच्या ३० किलो बॅगची किंमत २३७० रुपये असून सबसिडी ७५० रूपये मिळणार असून शेतकऱ्यांना १६२० रुपये द्यावे लागणार आहेत. तर एससी प्रवर्गासाठी ११२५ इतकी सबसिडी व १२४५ रुपये द्यावे लागणार आहेत. यामध्ये सामान्यासाठी प्रतिकीलो ५४ रूपये तर एससी प्रवर्गासाठी ४१.५ रूपये दर आहे.
सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना जेएस- ९३०५ या जातीच्या ३० किलो बॅगची किंमत २४०० रुपये इतकी असून ७५० रुपये सबसिडी तर शेतकऱ्यांना १६५० रुपये द्यावे लागणार आहेत. तर एससी प्रवर्गातील शेतकऱ्यांना ११२५ इतकी सबसिडी तर १२७५ रुपये द्यावे लागणार आहेत. सोयाबीन खरेदीसाठी येताना शेतकऱ्यांनी आधार कार्ड झेरॉक्स सातबारा उतारा, हिरवळ दाखला व एससी प्रवर्गातील नागरिकांना जात प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. तसेच ३० किलो बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्याचे किमान ४० गुंठे क्षेत्र असणे आवश्यक आहे.
कृषी अधिकारी दीपक कौजलगी म्हणाले, निपाणी रयत संपर्क केंद्राच्या अतिरिक्त येणान्या विविध केंद्रांमार्फत सोयाबीन बियाणे वितरण सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची घाई न करता पावसाचा अंदाज घेऊनच पेरण्या कराव्यात असे आवाहन केले.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, एस. एस. ढवणे, सुनिल संकपाळ, बंडा घोरपडे, आनंदा यादव, नगरसेवक संतोष सांगावकर, किरण निकाडे, निता बागडे, उदय नाईक, विकास वासुदेव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta