निपाणी परिसरात संततधार : प्रशासनाकडून विविध उपाय योजना
निपाणी (वार्ता) : सलग तीन दिवस सुरू असलेल्या संतत धारेमुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा आणि दूधगंगा नदीवरील चार बंधारे गुरुवारी (२०) पाण्याखाली गेली आहेत. तर शुक्रवारी उर्वरित बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सावधगिरी बाळगत विविध उपायोजना केल्या आहेत.
निपाणी परिसरात गुरुवारी (ता.२०) दिवसभर ५७.७ मिलिमीटर पाऊस झाला. तालुक्यातील चिखली- कुरली, जत्राट भिवशी, भोज-भोजवाडी, कुन्नूर -भोज हे चार बंधारे पाण्याखाली गेल्याने वरील मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. या बंधाऱ्यांचा परिसरात महसूल खात्यासह पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला आहे. महसूल खात्यातर्फे नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसीलदार विजयकुमार कटकोळ, मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व इतर अधिकाऱ्यांनी दिवसभर पूर परिस्थितीच्या परिसरात नागरिकांवर नजर ठेवली आहे.
निपाणीसह परिसरात चार दिवसापासून पावसाची रिपरिप कायम आहे. वेद गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे शुक्रवारी वेदगंगा नदीचे पाणी पातराबाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकण विभागातही गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे एका दिवसात निपाणी भागातील नद्यांची ४ मीटरने पाण्याची पातळी वाढल्यामुळे तालुक्यातील चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास सिदनाळ, कारदगा -भोज बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आला आहे. तसेच धोकादायक मार्गावरुन वाहतूक न करण्याचे आवाहन पोलिस आणि महसूल प्रशासनाने केले आहे.