
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी; तालुका प्रशासनाच्या सूचना
निपाणी (वार्ता) : शुक्रवारपासून (ता.२१) पुढील चार दिवस निपाणी तालुक्यात अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोणत्याही ठिकाणी अतिवृष्टी होऊन नदी-नाल्यांना पूर येऊ शकतो. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना, शेतकऱ्यांनी शेतात जाताना सतर्कता बाळगावी, असा इशारा तहसीलदार विजयकुमार कटकोळ यांनी दिला आहे.
कोकण विभागासह निपाणी तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने पाणी साठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी होत असल्याने धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. त्यामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातर्फे नदीकाठच्या सर्व नागरिकांनाआवाहन व सतर्कतेचा इशा देण्यात आला आहे. पूर पाहताना सेल्फी काढू नका. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तसेच नदीकाठच्या नागरिकांनी नदीच्या पातळीत वाढ झाल्यास तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे.
नाले, ओढे, नदीकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे.पाणी पातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून दूर जावे.
पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये जुनाट अथवा मोडकळीस आलेल्या व धोकेदायकइमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. पूरग्रस्त भागातून वाहने चालवू नये. खांबावरील वीज तारांपासून सावध राहावे. पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. शिवाय
नदीच्या प्रवाहात उतरू नये, अशा सूचना तहसीलदारांनी दिल्या आहेत.
——————————————————————
हे करा
*पिण्याचे पाणी उकळून प्यावे
*जेवणाआधी हात स्वच्छ धुवून घ्यावेत.
*घाट, डोंगर रस्ते, अरुंद रस्ते, दरी खो-यातील प्रवास टाळावे
*धरण, नदी, धबधबे, डोंगरमाथा, घाट कपारी, जंगल रस्ते येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घावी.
*धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरू नये.
*आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षास संपर्क करावा.
Belgaum Varta Belgaum Varta