शहरवासीयांची मागणी; नगरपालिका आयुक्तांना निवेदन
निपाणी (वार्ता) : शहरातील चोरीसह समाजविघातक कृत्ये टाळण्यासाठी काही महिन्यापुर्वी निपाणी व परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. पण त्यापैकी बहुतांश कॅमेरे अनेक दिवसापासून बंद पडलेले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरामध्ये चोरीच्या घटना वाढत आहेत. चोरट्यांचा पोलीस खात्याला शोध घेण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यासाठी नगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्वच सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्ती करून पोलिस आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, या मागणीचे निवेदन येथील नगरपालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांना मंगळवारी (ता.२५) दिले.
याबाबत निवेदनातील माहिती अशी, निपाणी शहर आणि महत्त्वाच्या ठिकाणी चोरीसह समाज विघातक घटना टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. यावेळी स्थानिक ठेकेदाराकडुन उच्च प्रतीच्या कॅमेऱ्यांचे दर घेऊन हलक्या प्रतीचे लाखो रुपये खर्च करून कॅमेरे बसविण्यात आले. त्यामुळे काही महिन्यातच ते नादुरुस्त झाले आहेत. कॅमेऱ्याच्या दुरुस्तीचे काम संबंधित कंत्राटदाराकडेच असताना त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. अनेक कॅमेरे नादुरुस्त झाल्याने शहरात महत्त्वाच्या ठिकाणी लहान मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्या आहे. परिणामी अनेक कुटुंबीयांना फटका बसत आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांना कठीण होत आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ खराब झालेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून घडणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालावा. तसेच हलक्या प्रतीचे कॅमेरे वापरलेल्या संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी. आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ सीसी कॅमेरे दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले.
सदरचे निवेदन माजी नगराध्यक्ष विजय शेटके, माजी सभापती अल्लाबक्ष बागवान, असलम शिकलगार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती किरण कोकरे, निकु पाटील,धनाजी निर्मळे, सुनील हिरूगडे, मुकुंद रावण, संदीप चावरेकर, गजेंद्र पोळ, रवींद्र श्रीखंडे, चौगुले, सुभाष कांबळे, शरीफ बेपारी, सैफुल पटेल, विजय घाटगे, किरण पाटोळे, सुनील गाडीवड्डर, विकास गायकवाड, अशोक लाखे, प्रवीण हेगडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta