
निपाणी (वार्ता) : शेती पिकासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींना सलग १६ तास वीज पुरवठा व्हावा, आतापर्यंत शॉर्टसर्किटने जळालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला योग्य नुकसान भरपाई मिळावी, उघड्यावरील ट्रान्सफॉर्मर आणि फ्युज पेट्यांचा बंदोबस्त करावा, यासह विविध मागण्यांसाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे हुबळी हेस्कॉम कार्यालयावर मंगळवारी (२९) मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी चिक्कोडी आणि निपाणी परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी नऊ वाजता निपाणी येथील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाजवळ एकत्रित येण्याचे आवाहन संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केले आहे.
राजू पोवार म्हणाले, हेस्कॉमच्या गलथान कारवारामुळे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये शेतातून गेलेल्या विद्युत वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होऊन हजारो एकर ऊस जळत आहे. याशिवाय तुटून पडलेल्या विद्युत वाहिन्यामुळे अनेक शेतकऱ्यांसह जनावरांचाही मृत्यू झालेला आहे.मात्र संबंधित अधिकारी केवळ पंचनामा करून रिकामे होत आहेत. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. तसेच प्रत्येक गावातील विद्युत पुरवठ्याच्या अडचणी बाबत तक्रार बुक ठेवून त्यानुसार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात. आतापर्यंत जळालेल्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी. त्याशिवाय शेतामधील लोंबकळरणाऱ्या विद्युत वाहिन्या व वाकलेल्या विद्युत खांबांची तात्काळ दुरुस्ती करावी. शेतीवाडीतील उघड्यावरील फ्युज पेट्यांचा बंदोबस्त करून त्यापासून होणारा धोका टाळावा. यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शेतकऱ्यांना नदी, विहीरी आणि कुपनलिकेच्या पाण्यावर पिके जगवावी लागणार आहेत. त्यामुळे शेती वीज पंपासाठी सलग सोळा तास वीजपुरवठा करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी निपाणी चिकोडी परिसरातील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन राजू पोवार यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta