निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वराची रस्त्याच्या कडेला थांबलेल्या जेसीबीला जोराची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता.२९) रात्री घडली विजय सदाशिव बाबर (वय ३२ रा. यरनाळ) असे या युवकाचे नाव आहे.
अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, यरनाळ येथील युवक विजय बाबर हा पुणे -बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळील ३० छाप बिडी कारखान्याजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करत होता. बुधवारी (ता.३०) रक्षाबंधन सण असल्याने या दिवशी सुट्टी घेणार असल्याचे सांगण्यासाठी तो निपाणी होऊन महामार्गावरून हॉटेलकडे निघाला होता. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या जेसीबीला दुचाकीची जोराची धडक बसली. त्यामुळे त्याच्या तोंडाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे उपचाराला नेण्यापूर्वीच त्याचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी आणि सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. बुधवारी सकाळी शवाविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर दुपारी विजयवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदाशिव बाबर यांना विजय हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या अपघाती मृत्यूमुळे यरनाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत विजय याच्या मागे आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. निपाणी शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta