
निपाणी (वार्ता) : उसने घेतलेले दोन लाख रुपये परत करण्याच्या बहाण्याने मित्राचे अपहरण करून त्याचा भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी (ता.३) सकाळी उघडकीस आली. तर संशयित आरोपी कौस्तुभ अमोल औंधकर (वय २१, रा. मुगळे गल्ली, निपाणी) व शैलेश संभाजी बोधले (२३, रा. बालाजी नगर, निपाणी) हे दोघेही त्याच दिवशी सायंकाळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांचा निपाणी पोलिसांनी रात्रीच ताबा घेऊन निपाणी येथे आणून अधिक चौकशी सुरू केली आहे. दिलेले पैसे परत द्यावे लागणार असल्याच्या भीतीनेच शैलेश बोधले यांनी आपल्या मित्राला घेऊन राहुल शिवाप्पा सुभानगोळ (वय ३०. मूळ गाव म्हसोबा हिटणी, ता. हुक्केरी, सध्या रा. हौसाबाई सावंत कॉलनी, निपाणी) याचा काटा काढल्याचा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे.
चार महिन्यांपूर्वी राहुलने आपला वेंगुर्ला येथील मित्र अमरकडून २ लाख रुपये उसने घेऊन शैलेशला दिले होते. त्या पैशाची मागणी अमर राहुलकडे करत होता. मात्र एक महिना झाला तरी पैसे परत मिळाले नव्हते. त्यामुळे राहुलने याची कल्पना शैलेशला देऊन मित्राचे पैसे लवकरात लवकर देण्याची विनंती केली होती.
सोमवारी (ता.२) सायंकाळी शैलेश राहुलच्या घरी जाऊन त्याने ‘मी तुझ्या मित्राचे घेतलेले पैसे तुला परत करणार असून त्यासाठी कोल्हापूरला जावे लागेल’ असे सांगितले. त्यानुसार राहुल हा शैलेशच्या दुचाकीवरून निघून गेला होता. त्यानंतर तो रात्री परत न आल्याने राहुलच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली होती.
शैलेश बोधले यांनी आपला जवळचा मित्र कौस्तुभ औंधकर याला हाताशी धरून राहुलच्या खुनाचा कट रचनेची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. दरम्यान मंगळवारी रात्री उशिरापर्यंत निपाणी पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली. त्यातून केवळ रक्कम परत द्यावी लागणार असल्याने राहुलच्या काटा काढण्याच्या उद्देशाने त्यांनी हा खून केला असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय निपाणी पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना घटनास्थळी घेऊन जाऊन खुना बाबतची माहिती घेतली आहे. याशिवाय यापूर्वी दोघांच्या मध्ये भांडण तंटे झाले होते का, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. या माहितीच्या आधारे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पुढील कारवाई होणार असल्याचे चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta