
२७ रोजी मुख्य दिवस; तयारीला वेग
निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणाऱ्या येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क.स्व) यांचा उरूस गुरूवार (ता.२६) ते शनिवार (ता.२८) या काळात साजरा होणार आहे. येथील चव्हाण वाड्यामध्ये सनई वादनाने ऊरूस कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. तर केवळ आठवडा शिल्लक राहिल्याने ऊरुसातील सुविधा व इतर कामांना वेग आला आहे.
ऊरुसानिमित्त सोमवारी (ता.२३) चव्हाण वारसांच्या हस्ते चुना, बुधवारी (ता. २५) चव्हाण वारसांच्या हस्ते मंडप चढविला जाणार आहे.
गुरूवारी (ता.२६) गंधरात्र असून गंध चव्हाणवाड्यातून मिरवणुकीने निघणार आहे. या दिवशीच बेडीवाल्यांचा उरूस आहे.
शुक्रवारी (ता.२७) भर उरूस असून यादिवशी चव्हाणवाड्यातून येणारा गलेफ पहाटे चढविण्यात येणार आहे. शनिवारी (ता.२८) खारीक च उदीचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (ता.२९) मानाचे फकीर यांची रवानगी व भंडारखाना, मंगळवारी (ता.३१) पाकाळणी कार्यक्रम व गोडा नैवेद्य दाखवला जाणार आहे. उसानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून यामध्ये ओपन गावगन्ना बैलगाडी, घोडा बैलगाडी, गाडी मागून श्वान पळवणे, घोडागाडी शर्यती, कुस्त्यांचे मैदान, कव्वालीचा कार्यक्रमचा समावेश आहे.
Belgaum Varta Belgaum Varta