वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे प्रवासी संतप्त
निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानकामधील महाराष्ट्रात जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवर बस मध्ये चढताना महिलेचे दीड तोळ्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. मंगळवारी (ता. २१) सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली. यावेळी सदर महिलेने आरडाओरड करूनही दागिने न मिळाल्याने संतप्त महिलेला रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, काही महिन्यापासून कर्नाटकातील महिलांना बस प्रवास मोफत करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत दिली जात आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. येथे आगारातील महाराष्ट्र ठिकाणी सदर महिला आपल्या गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत होतो. यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन सदर चोरट्याने महिलेचे दीड तोळ्याचे दागिने आणि पर्समधील रोख एक हजार रुपये मारून पोबारा केला. यावेळी महाराष्ट्र आगारातील थांब्याजवळ असलेल्या कंट्रोलरला याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी बस स्थानकातील पोलिसांना त्याबाबतची माहिती दिली. पण सदर महिलेचे दागिने मिळून आले नाहीत.
दरम्यान याबाबत प्रवासी आणि नागरिकांनी बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली. आतापर्यंत अशा बऱ्याच घटना घडल्या असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना घडल्यानंतर तपास करणे कठीण होत असल्याचे पोलीसासह नागरिकांचे म्हणणे आहे. तरी बस स्थानकात तात्काळ सीसीटीव्ही बसण्याची मागणी महाराष्ट्र आगारातील अधिकारी व प्रवाशांनी केली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.