रयत संघटनेच्या बैठकीत निर्णय
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने बेळगावसह काही जिल्हे दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत. पण आजतागायत नुकसान भरपाई दिलेली नाही. यासह विविध मागण्यांसाठी रयत संघटनेच्या कार्यालयात कर्नाटक राज्य रयत संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. मागण्यांच्या पूर्ततेसाठी २ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून राजकीय नेते मंडळी या कामात गुंतले आहेत. वाळलेल्या उसासह जळीत उसाची शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई दिलेली नाही. याबाबत संघटनेतर्फे तहसीलदारांपासून मुख्यमंत्र्यापर्यंत निवेदने दिली आहेत. याशिवाय मोर्चे, आंदोलने केली आहेत. तरीही प्रशासनासह नेते मंडळींचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून कुपनलिका, विहिरीचे पाणी खालावत आहे. याबाबत कोणतीही बैठक घेऊन पाण्याच्या सुविधाबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे २ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. त्यामध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले.
यावेळी राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, प्रकाश नाईक, सुभाष शिरगुर, सुरेश परगन्नावर, रमेश गडादी, किसन नंदी, वासू पांढरोळी, सुरेश संपगावी, सोमू बिराजदार, रवी सिद्दन्नावर, एस. बिज्जुर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.