परीक्षा केंद्राबाहेर पालकांची गर्दी ; १२ केंद्रावर व्यवस्था
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात दहावीच्या परीक्षेला सोमवारी (ता.२५) सुरुवात झाली. शिक्षण विभागाने यावर्षी राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानाला निपाणी विभागात चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वच परीक्षा केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
यंदा कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असल्याने अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यावरील ताण कमी व्हावा, यासाठी दोन पेपर्समध्ये अंतर ठेवण्यात आले आहे. यावर्षी निपाणी
विभागातून १२ केंद्रांवर ३९७४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी पहिलाच पेपरला २७ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.
सकाळी १०.३० वाजता पहिल्या पेपरला सुरुवात झाली. तत्पूर्वी १० वाजताच विद्यार्थ्यांना तपासणी करून परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला.
परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी शिक्षण विभागाची भरारी पथके प्रशासनाकडून तैनात करण्यात आली आहेत. यासह प्रत्येक केंद्रावर बैठे पथक असून ते परीक्षेच्या एक तास अगोदर आणि परीक्षेनंतर एक तास केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. महिलांचेही एक स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे.
——————————————————————
पालकांची गर्दी
दहावीच्या परीक्षांचे टेन्शन जसे मुलांना असते.तसेच टेन्शन पालकांनाही असते. त्यामुळे सकाळी ९ वाजता पेपर देण्यासाठी पाल्यांना सोडण्यास आलेल्या पालकांचे चेहरे तणावात दिसत होते. प्रत्येकजण पाल्यांना शांततेत पेपर सोडव, प्रश्न निट वाचून सोडव असे सल्ले देत होते. त्यामुळे पेपर पूर्ण होईपर्यंत पालकांनी परीक्षा केंद्रांवर गर्दी केली होती.
——————————————————————-
इंग्रजी, गणिताच्या पेपरवर लक्ष
प्रशासन दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात, यासाठी आग्रही आहे. त्यामुळे इंग्रजी, गणिताचा पेपर अद्याप होणार आहे. त्यामुळे या पेपर दरम्यान कॉपी रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.