निपाणी (वार्ता) : वाढत्या महागाईमुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत हमीभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तंबाखूला अत्यल्प दर मिळत आहे. याशिवाय तंबाखूला बिनभरोशाचा दर मिळतो आहे. परिणामी तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जयसिंगपूर येथील तंबाखू व्यापारी सुभाषचंद्र नथामल रुणवाल यांचे बिचायतीदार शांतीलाल शहा यांनी सामाजिक बांधिलकीतून अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर १७१ रुपये असा उच्चांकी प्रति किलो दर दिला आहे. पांगीरे (ए) येथील प्रगतशील शेतकरी सुभाष अण्णासाहेब पाटील यांचा ९९ बोद तंबाखू शहा यांनी खरेदी केला. या दरामुळे तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठे तंबाखू व्यापारी खरेदीला प्रारंभ करतात. तत्पूर्वी आर्थिक अडचणीत असलेल्या छोट्या शेतकऱ्यांनी १०० ते १३० रुपये किलो प्रमाणे तंबाखूची विक्री केली आहे. आता अक्षय तृतीया नंतर सर्वच व्यापारी खरेदीसाठी गुजरात व इतर राज्यातून येत आहेत. शिवाय काही व्यापाऱ्यांनी तंबाखूला यंदा चांगला दर देण्यास सुरुवात केली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेने पुन्हा दर वाढण्याची शक्यता तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शांतीलाल शहा यांनी, तंबाखू खरेदी-विक्रीच्या हंगामात व्यापाऱ्यांना फायदा होतोच. पण उत्पादकांचा विचार करून त्यांना योग्य भाव देण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांची असल्याचे सांगितले. यावेळी मुन्ना देसाई- पाश्चापूर, ममदापूरचे उत्तम पाटील, संभाजी हरेल, सुभाष पाटील व शेतकरी वर्ग उपस्थित होता.