निपाणी परिसरात नुकसानीची पाहणी
निपाणी (वार्ता) : वादळी वारे व पावसामुळे निपाणी तालुक्यात अनेक घरे, गॅरेज, दुकान, मालमत्तेसह झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे करून पंचनाम्यासह तात्काळ नुकसान भरपाई दिली जाईल. तसा आदेश तहसीलदारांना दिल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी नुकसानीच्या पाहणीची मागणी पालकमंत्र्याकडे केली होती. त्यानुसार जारकीहोळी यांनी गुरुवारी (ता.१७) सायंकाळी पाहणी करून ते बोलत होते.
पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले, वादळी वाऱ्यामुळे जनावरांचे गोठे, घरे, कुक्कुटपालन, शाळासह इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सरकार सर्वांनाच भरपाई देणार आहे. अनेक शाळा आणि मोठ्या इमारतींचे छत शेजारील घरावर पडून नुकसान झाले आहे. तालुक्यातील महसूल खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. वीज वाहिन्या व खांबाचे नुकसान झाले असून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. डोंगर पट्ट्यामध्ये वीज वाहिन्या व खांबांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या टप्प्यात १४ घरांचे नुकसान झाले आहे. सर्व माहिती संकलित करून नुकसानग्रस्तांना मदत केली जाणार आहे.
यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील,माजी आमदार काकासाहेब पाटील, बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष निकु पाटील, युवा उद्योजक रोहन साळवे, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, नगरसेवक विलास गाडीवड्डर्, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, सुजय पाटील, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, नगरसेवक बाळासाहेब देसाई- सरकार, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, राज पठाण, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, नगरसेवक डॉ. जसराज गिरे, अनिस मुल्ला, रवींद्र श्रीखंडे, अब्बास फरास, किरण कोकरे, ॲड. संजय चव्हाण, नवनाथ चव्हाण, विश्वास पाटील, प्रतीक शहा, वर्षा चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————————————————–
तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष
नुकसान होऊन चार दिवस उलटले आहेत. विजेअभावी पाणीपुरवठा ठप्प आहे. तरीही त्याकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. विद्यमान आमदारांनी आपले कर्तव्यही पार पाडलेले नाही, असेही ते म्हणाले.
——————————————————————-
भीमनगर परिसरात विकास कामावरून गोंधळ
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी भीमनगर परिसरातील शाळा आणि नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी या परिसरात विकास कामे न केल्याचे सांगून नागरिकांनी गोंधळ घातला.