माजी सभापती प्रा. चिकोडे; नगरपालिका आयुक्तांना निवेदन
निपाणी (वार्ता) : शहरातील काही प्रमुख मार्गावरील रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. पण काही प्रमुख मार्गावरील रस्त्यासह गल्ली बोळातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे लहान मोठे अपघात होत आहेत. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी खड्ड्यांमध्ये डांबर खडी घालून मुजवावेत, या मागणीचे निवेदन माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी नगरपालिकेला दिले.
निवेदनातील माहिती अशी, शहरातील ग्राम दैवत हजरत गौसपाक दस्तगीरसाहेब यांच्या दर्ग्याकडे जाणाऱ्या जुना मोटार स्टॅन्ड, कन्या शाळा, नागोबा गल्ली, बेल्लद बोळ रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या मार्गावरून अंमलझरी, समाधी मठ परिसरातील नागरिकांची वर्दळ असते. पण खड्ड्यामुळे पादचारी, दुचाकीस्वारांची गैरसोय होत आहे.
सध्या जून महिना सुरू झाला असून पावसाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे लहान खड्ड्यात पाणी साठून खड्ड्यांच्या आकारात वाढ होणार आहे. शिवाय पावसाळ्यात पॅचवर्क करणे कठीण आहे. त्यामुळे रस्ते डांबरीकरण करण्यापेक्षा निदान खड्डे डांबरीकरणाने मुजवावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी निवेदन स्वीकारून लवकरच खड्डे मुजवण्याची ग्वाही दिली.