वाहनधारकांना त्रास; प्राधिकरणाने वृक्ष लागवड करण्याची मागणी ; जागतिक पर्यावरण दिन विशेष
निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर सध्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. याशिवाय रस्त्यावरील गावाजवळ उड्डाणपूल उभारणीचे काम चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर वर्षांपूर्वीच रस्त्याकडेची झाडे तोडली आहेत. मात्र या राष्ट्रीय महामार्गाच्या महामार्ग प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वी वृक्ष लागवड करावी, अशी मागणी निपाणी आणि परिसरातील पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्राधिकरणाकडून राष्ट्रीय महामार्ग चकाचक करण्यात आला. त्यात या मार्गाचे सहा पदरीकरण केले जात आहे. शिवाय बऱ्याच अंडरपास जवळ समांतर रस्त्यांचे काम सुरू आहे. मात्र, या महामार्गावर वृक्ष लागवडच झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण महामार्ग वृक्षविना सुनासुना दिसत आहे. म्हणून याबाबत गांभीर्याने दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वीच या मार्गालगत वृक्षांची लागवड करावी. त्यामुळे निश्चितपणे या महामार्गावर हिरवळ निर्माण होईल. शिवाय प्रवाशांचा प्रवास अल्हाददायक होऊन पर्यावरणाचा समतोल टिकणार आहे. यासाठी महामार्ग प्राधिकरणाने वृक्ष लागवडीच्या महत्त्वपूर्ण निर्णयाकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून करण्यात येत आहे.
दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अनेक दिशादर्शक फलकांवर प्रवाशांसाठी विविध सूचनांचे फलक लावले जातात. मात्र महामार्ग प्राधिकरणाकडून वृक्ष लागवडीबाबत कोणतीच हालचाल दिसून येत नाही. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
—————————————————————–
‘राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी वर्षापूर्वी रस्त्याकडेची झाडे तोडली आहेत. रस्त्याचे काम प्रगतीपथावर असले तरी आजवर रस्त्याच्या कडेला वृक्षलागवड केलेली नाही. त्यामुळे हा महामार्ग वृक्षविना ओसाड दिसत आहे. त्यासाठी संबंधित विभागाने पावसाळ्यापूर्वीच याबाबत निर्णय घेतल्यास संपूर्ण बायपास हिरवळीने अच्छादून पर्यावरणाचा समतोल टिकून राहील.’
– फिरोज चाऊस,
अध्यक्ष सृष्टी पर्यावरणवादी संघटना, निपाणी