नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालानंतर आता देशामध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीकडून सरकार स्थापन करण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. अशामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. नरेंद्र मोदी आजच सत्ता स्थापनेसाठी दावा करणार आहे. मित्रपक्षांसोबतच्या बैठकीमध्ये भाजप हा निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोदी सरकारचा ८ जूनला शपथविधी होणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
आज दिल्लीमध्ये एनडीएची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मित्र पक्ष दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे दोघे देखील किंगमेकर ठरू शकतात असे म्हटले जात आहे. अशामध्ये आता मोदी आजच सरकार स्थापनेसाठी दावा करणार असल्याचे बोलले जात आहे. एनडीएच्या महत्वाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपला पूर्ण बहुमत नाही. एनडीएतील मित्र पक्षांच्या सहमतीने त्यांना पूर्ण बहुमत मिळाले आहे. इंडिया आघाडी या खासदारांची किंवा पक्षांची तोडफोड करू शकते. त्यामुळे आजच खबरदारीचा उपाय म्हणून भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. आज सायंकाळी ४ वाजता एनडीएची जी बैठक होणार आहे या बैठकीला सर्व मित्रपक्षांच्या प्रमुखांना बोलावण्यात आले आहे. या बैठकीमध्ये एनडीएचा नेता किंवा संयोजक निवडला जाईल. त्यातच आजच सत्ता स्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीमध्येच राष्ट्रपतींना दिल्या जाणाऱ्या लेटरवर मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सह्या घेतल्या जाणार आहे. आजच संध्याकाळी हे लेटर राष्ट्रपतींना दिले जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रपतींना बहुमताचा आकडा सांगण्यात येणार आहे. राष्ट्रपतींकडून लगेचच एनडीएला सत्ता स्थापनेचे निमंत्रण मिळू शकते. त्यानुसार येत्या ८ जूनला मोदी सरकारचा शपथविधी होऊ शकतो. १० जूनपासून नरेंद्र मोदी ५ ते ६ दिवसांचा विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शपथविधी व्हावा यासाठी एनडीएकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. देशामध्ये भाजपप्रणित एनडीए २९४ जागांवर विजयी झाले आहे. तर काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी २३१ जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू हे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या भूमिकेकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.