निपाणी (वार्ता) : ज्ञानाच्या आड कोणतीही सीमा येऊ शकत नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणून सेट परिक्षेच्या निकालाकडे पाहता येईल. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणीचे कार्याध्यक्ष अमर पाटील हे इंग्लिश विषयामध्ये, रमेश कुंभार राज्यशास्ञ विषयातून तर कार्यकारिणी सदस्य सनमकुमार माने हे लायब्ररी सायन्स या विषयांमधून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे सीमाभागातून त्यांचे कौतुक होत आहे.
सीमाप्रश्न सुटावा म्हणून धडपडणारी तिसरी पिढी ही उच्च शिक्षित आहे. सीमाप्रश्न आणि शैक्षणिक कामगिरीबद्दल तितकीच जागरूक असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. तिन्ही युवक कार्यकर्त्यांची कौंटूंबिक व शैक्षणिक पार्श्वभूमी सर्वसामान्य असल्याने त्यांनी मिळवलेले यश मोठे आहे. दोन वर्षापूर्वी सनमकुमार माने हा युवक एमपीएससीची पूर्व परिक्षा, मुख्य परिक्षा व शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाला होता. परंतु सीमाभागातील रहिवाशी असल्याचे कारण पुढे करीत आयोगाने सनमकुमारला मुलाखतीतून डावलले होते.
कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी सनमकुमार माने याच्यावर महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाने केलेल्या अन्यायाला महाराष्ट्राच्या विधानसभेत वाचा फोडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, सीमामंत्री या सर्वांकडे गा-हाणे मांडले. न्यायालयाचा दरवाजा ठोठावला तरीदेखील महाराष्ट्राच्या आयोगाने त्याला नाकारले. त्यानंतर सनमकुमार माने याने सलग दोन वर्षात राष्ट्रीय पात्रता परिक्षेत यश मिळवले. दोन दिवसापूर्वी सेट परिक्षेतील सनमकुमारच्या यशाने हॅट्रिक केली. सीमाभागातील मुलांमध्ये गुणवत्ता असताना केवळ सीमाप्रश्नाचे कारण पुढे करुन डावलले जाणे यासाठी तिघांनी ज्ञानाच्या बळावर घेतलेली झेप कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.
सीमाभागातील युवकांच्या यशात महाराष्ट्र एकीकरण समिती युवा नेते शुभम शेळके, म. ए. समिती निपाणीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, म. ए. युवा समिती निपाणी अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, उपाध्यक्ष कपिल बेलवळे यांचे सहकार्य व पाठींबा मिळाला. भविष्यात सीमाभागातील युवकांच्या शिक्षण, नोकरीआड येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचा मनोदय समिती नेत्यांनी व्यक्त केला.