निपाणी (वार्ता) : माजी मंत्री व विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऊस, सोयाबीन दरासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली.
यंदाच्या हंगामात महाराष्ट्रातील कारखान्या प्रमाणे कर्नाटकातील साखर कारखान्यांनी दर दिला पाहिजे. सोयाबीनच्या खरेदीमध्ये फसवणूक होत असून शासनाने हमीभाव देऊन त्याची खरेदी करावी. परतीच्या पावसाने सोयाबीन, भाजीपाला आणि ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचा नि:पक्षपातीपणे सर्वे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी. याशिवाय विविध विषयावर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या न सोडविल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. शिवाय यापुढील काळात शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळी शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळणे आवश्यक असल्याचे राजू पोवार यांनी सांगितले. भेटी प्रसंगी माजी आमदार उल्हास पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, नगरसेवक प्रशांत पाटील, मयूर पवार, रोहन पाटील यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.