रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार ; कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांची बैठक
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर चिक्कोडी विभागात दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. बहुतांश ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहेत. सततच्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मका, मिरची, भाजीपाला पिकासह इतर पिके पूर्ण वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसगने हिरावून घेतला आहे. याशिवाय विविध भागात ऊसही पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केली. शनिवारी (ता.२७) संपर्क कार्यालयात आयोजित शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणाले, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्याशी संवाद साधून व्यथा जाणून घेतल्या. मात्र, शेतकऱ्यांना दिलासा देणारा कोणताही निर्णय शासनस्तरावरुन झालेला नाही. यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करीत आहोत. शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. ओला दुष्काळ असतानाही सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही. यात शासनाची राजकीय इच्छा शक्ती नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कर्जासाठी कुठलाही तगादा लावू नये. पावसाने पूर्ण शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रति हेक्टर ५० हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा करावी. अनेक ठिकाणी जमीनी खरडून गेल्याने यात कुठलेही पीक येणार नाही. त्यामुळे शासनाने पाच लाख रुपये व रब्बीत कामी न येणाऱ्या जमिनीसाठी ५० हजार रुपये अतिरिक्त देण्यात यावे.
——————————————————————-
पंचनामे वेळेत करा
अतिवृष्टीग्रस्त भागातील तत्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ते आर्थिक साहाय्य व मदत मिळावी.तसेच पंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित प्रशासनास आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. याकरिता आपल्या सहानुभूतीपूर्ण व सकारात्मक निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असेही पोवार यांनी सांगितले.
बैठकीस एकनाथ सादळकर, अजित नलावडे, महादेव शेटके, संजय पोवार, सर्जेराव हेगडे, नामदेव साळुंखे, प्रभाकर वाडेकर, बाबासाहेब पाटील, चिनु कुळवमोडे, सुभाष खोत, सागर वाडेकर, पिंटू लाड, सुनील पाटील, दादासाहेब सादळकर, मयूर पोवार, सागर पाटील, सचिन कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta