
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्वराज्य रक्षक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ नामदेव चव्हाण (रा. आदर्शनगर, निपाणी) यांनी शनिवारी (ता.१) येथे आयोजित काळादिन कार्यक्रमात बुधवारी (ता.५) नगरपालिकेवरील जीर्ण झालेला भगवा ध्वज बदलून नव्याने ध्वज फडकविणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या भावना भडकण्याची शक्यता असल्याने बुधवारी (ता.५) सकाळी त्यांना घरातूनपोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. दुपारी ३ वाजता तालुका न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर केल्यानंतर त्यांची ५ लाखांच्या वैयक्तिक जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली. निपाणी नगरपालिका कार्यालयावर बऱ्याच वर्षापासून भगवा ध्वज लावण्यात आला आहे. तो ध्वज जीर्ण झाल्याने त्या ठिकाणी मराठी भाषिकांतर्फे नवीन ध्वज फडकवण्यात येणार होता. त्यामुळे भाषिक तेढ निर्माण होण्याची शक्यता ओळखून पोलिसांनी चव्हाण यांच्यावर गेल्या ३ दिवसापासून लक्ष ठेवले होते. याबाबतची नोटीसही त्यांना दिली होती.
पोलिस प्रशासनाने पाठविलेल्या अहवालानुसार तालुका दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.४) नोटीस बजावली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी न्याय दंडाधिकाऱ्याऱ्यांपुढे हजर राहण्याचे आदेश बजावले होते. खबरदारी म्हणून पोलिस प्रशासनाने चव्हाण यांना सकाळीच ताब्यात घेतले होते. चव्हाण यांची कलम १२६ अंतर्गत चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ००६३/२०२५ नोंदवला आहे. यापूर्वी शहरातील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक केंद्रासमोरील संकुलाच्या बांधकामाच्या भूमिपूजन समारंभात त्यांनी २०१७ साली आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दलही शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Belgaum Varta Belgaum Varta