Sunday , September 20 2026
Breaking News

शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; महापालिकेचे दुर्लक्ष!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांचा संचार वाढला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे रात्रीच्या वेळी लहान मुले महिला किंवा वृद्ध नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. दोन महिन्यांपूर्वीच गांधीनगर येथील आराध्या नावाच्या दोन वर्षाच्या बालिकेवर कुत्र्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते तर नुकताच बेळगाव शहरातील रेल्वे स्थानकाजवळ कुत्रा अचानक दुचाकीच्या समोर आल्यामुळे झालेल्या अपघातात ऐश्वर्या बडमंजी या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. भटक्या कुत्र्यांमुळे शहर परिसरात अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. वारंवार मागणी करून देखील महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनेंकडे दुर्लक्ष केले आहे. यावरून महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. बेळगाव महानगरपालिका एकंदरीत सर्वच बाजूने कुचकामी ठरत असून भटक्या कुत्र्यांवरील कारवाईचा अभाव प्रशासनाच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी महानगरपालिकेने झटकली आहे की काय असा प्रश्न सध्या नागरिकांतून उपस्थित होत आहे अजून किती जीव गेल्यानंतर महानगरपालिका जागी होणार असा अहवाल देखील शहरवासीय करीत आहेत. भटक्या कुत्र्यांची समस्या ही शहरापुरती मर्यादित नसून आसपासच्या उपनगरांत देखील भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. त्याचप्रमाणे शहरालगत असलेल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये देखील कुत्र्यांचा संचार वाढला आहे त्यामुळे शहरासोबतच ग्रामीण भागात देखील भटक्या कुत्र्यांबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. महानगरपालिकेकडून कुत्र्यांचे निर्भीजीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येते परंतु निर्भीजीकरण लस दिल्यानंतर या कुत्र्यांना पुन्हा शहरात सोडले जात असल्याने कुत्र्यांची संख्या आटोक्यात आली असली तरी शहरवासीयांना भटक्या कुत्र्यांचा उपद्रव्याप सहन करावा लागतोच, त्यामुळे महानगरपालिकेने तात्काळ भटकी कुत्री पकडण्याची मोहीम राबवावी व त्या कुत्र्यांना अन्यत्र स्थलांतरित करून यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहरवासीयातून केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *