
राजू पोवार; यरनाळमध्ये ‘रयत संघटनेतर्फे शेतकरी मेळावा
निपाणी (वार्ता) : ऊसाच्या उप पदार्थापासून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येकी एक हजार रुपये दिले पाहिजेत. शेतकऱ्यांना वीज पंपासाठी दहा तास थ्री फेज वीज पुरवठा करावा. शेतकऱ्यांचे कर्ज आणि व्याज माफ करून ५८ वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना दर महिना पाच हजार रुपये वेतन दिले पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या समोर गुरुवारी (ता.११) कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले. यरनाळमध्ये रयत संघटनेच्या शाखेचे उदघाटन व आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रयत संघटनेच्या शाखेचे उद्घाटन झाले. पोवार म्हणाले, खासगी ऐवजी एपीएमसीच्या बाजार समितीमध्ये सोयाबीन आणि भाजीपाला मार्केट भररले पाहिजे. यंदा झालेल्या अतिवृष्टी व महापरामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन होणार असून परिसरातील शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
रयत संघटनेच्या यरनाळ शाखेच्या अध्यक्षपदी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बाळासो ऐवाळे यांची निवड करण्यात आली. मेळाव्यास सर्जेराव हेगडे, दयानंद पाटील, सागर पाटील, आनंदा गायकवाड, मयूर पोवार, शिवाजी वाडेकर, अर्जुन नाईक, बंटी पाटील, सचिन हेगडे, रघुनाथ ऐवाळे, भुपाल ऐवाळे, रवी पाटील, शरद पोवार, धनाजी कांबळे, विठ्ठल कांबळे, अजय पोवार, बाळ गुंडा पोवार, शेखर ऐवाळे, सागर पाटील, विजय टिपुकडे, शशिकांत संकपाळ, शिवाजी पाटील, विष्णू ऐवाळे, अमर गुरव, अशोक ऐवाळे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta