
दोड्ड जैन बस्ती जीर्णोद्धाराला ५० लाख; नगरसेवक शरद जंगटे यांची माहिती
निपाणी (वार्ता) : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून येथील मुस्लिम समाजाच्या शादीमहलसाठी १ कोटी तर जैन समाजाच्या दोड्ड बस्तीसाठी ५० लाखाचा निधी मंजूर झाल्याची माहिती हालशुगर संचालक नगरसेवक शरद जंगटे यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
जंगटे म्हणाले, शहरातीलया दोड्ड बस्ती मंदिर जीर्णोध्दाराकडे दुर्लक्ष झाले होते. त्याची दखल घेऊन आमदार शशिकला जोल्ले यांनी मायनॉरिटी फंडातून २ कोटीचा निधी मंजूरीसाठी प्रस्ताव दिला होता. पहिल्या टप्प्यात या कामासाठी ५० लाखाचा निधी मंजूर झाला आहे.तर उर्वरित रक्कम ही बांधकामाच्या टप्प्याटप्प्याने मंदिर कमिटीच्या नावे येणार आहे.
शादीमहल बांधकासाठी २ कोटीचा प्रस्ताव पाठवला असता पहिल्या टप्प्यात १ कोटीचा निधी मंजूर होऊन याचाही उर्वरित निधी कामाचा टप्पा पूर्ण होताच मिळणार आहे. आमदार जोल्ले यांनी प्रत्येक समाजाच्या मंदिर जिर्णोद्धारासाठी शहराला निधी देऊन धार्मिकदृष्ट्या पुढारलेल्या शहराला गत वैभव आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
बैठकीस मनोज पाटील, अजित भुजगोंड पाटील, महावीर पाटील, बाहुबली पाटील, भरत पाटील, अजित तेरदाळे, फिरोज अफराज, शब्बीर मुजावर, जहांगीर शेख, आयुब मकानदार, बी. के. महाजन, जितू पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta