कारवाई करण्याची मागणी
कोगनोळी : हदनाळ ते मत्तीवडे या सीमाभागातील ६ किलोमीटरच्या महाराष्ट्र-कर्नाटक रस्त्यावर महाराष्ट्र हद्दीतील शेंडूर (ता. कागल) येथील काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी सोईचा असणारा हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत आहे. सदर शेतकऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी हदनाळकरांनी केली आहे.
हदनाळ-मत्तीवडे या दरम्यान ६ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. यातील २ किलोमीटर रस्ता कर्नाटक-महाराष्ट्र अशा संयुक्त सीमेवरुन जातो. हा रस्ता कर्नाटक हद्दीत आहे असे हदनाळ येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. असे असताना या रस्त्यावर महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी रस्त्यावरच मशिनच्या साहाय्याने चर खोदली आहे. हा रस्ता ऊस वाहतूक तसेच एमआयडीसी कामगार यांच्यासाठी सोयीचा आहे. त्यामुळे या पर्यायी रस्त्याचा उपयोग अनेक प्रवासी करीत आहेत.
पुर्वीपासून ३३ फूट रुंदीचा साखळी असणारा हा रस्ता सदर शेतकऱ्यांनी खोदला आहे. त्यामुळे प्रवाशांना या मार्गावरुन प्रवास करणे जिकीरीचे बनले आहे. हदनाळ येथील काही राजकीय मंडळींनी अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यास जाब विचारला असता हा रस्ता माझ्या हद्दीत असून मोजणी आणा व चर मुजवा असे उद्धट उत्तर या शेतकर्यांनी दिले. त्यामुळे संघर्ष होण्याची चिन्हे असून वरिष्ठ पातळीवरुन सदर रस्त्याचे मोजमाप होऊन हा रस्ता पुर्वस्थितीत करावा, अशी मागणी हदनाळवासियांतून जोर धरत आहे.
Check Also
गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेण्यात येणारी १८ वासरे, ३४ रेडके पकडली
Spread the love कागल पोलिसांची कारवाई; एक ताब्यात निपाणी : कत्तलीसाठी चार दिवस व एक …